“गेले काही महिने तुम्हाला हा जो काही त्रास होत आहे नां, ती सगळी पार्किन्सन्सची लक्षणे आहेत.”
फारसं कोणालाच न आवडलेलं पण तरीही प्रत्येकाच्या अगदी कायमचं स्मरणात राहिलेलं वाक्य!
काहींनी आव्हान म्हणून ऐकलेलं; पण बऱ्याच जणांसाठी पार्किन्सन्सच्या आजाराचे निदान झाल्यापासून आपल्या मनात एक प्रकारे या आजाराशी आणि त्यातून भविष्यात येणाऱ्या परावलंबी अवस्थेशी भावनिक संघर्ष सुरु होतो. या आजाराने ग्रासलेला जवळजवळ प्रत्येकजण एकदा तरी डिप्रेशनच्या गर्तेत जातोच, आणि सुमारे ५०% रुग्णांना त्यासाठी औषधे ही घ्यावी लागतात. दिवसागणीक येणारे परावलंबित्व, नेहमीच्या आयुष्यातील अगदी सध्या सोप्या गोष्टी न करता येणं, औषधोपचारांचा खर्च आवाक्याबाहेरचा होणं, यातून पूर्णपणे बाहेर येणं तर सोडाच पण आजच्या वैद्यकीय जगाला या आजाराची वाढ थांबविणे पण अवघड आहे असे लक्षात आल्यावर साहजिकच होणारी असहाय्य चीडचीड... सगळं सगळं या भावनिक ऱ्हासाला कारणीभूत ठरू शकतं. केवळ रुग्णच कशाला, पण त्याची काळजी घेणारी जवळची व्यक्ती सुद्धा बरेचदा या औदासिन्याला बळी पडते. या मानसिक बदलामुळे मूळ पार्किन्सन्सच्या लक्षणांतही वाढ होऊ शकते, अथवा त्याच्या उपचाराच्या आपल्या प्रयत्नांना बाधा येऊ शकते.
पार्किन्सन्सच्या रुग्णात दिसणारी भावनिक लक्षणे:
- आजाराबद्दल अति काळजी
- मनात सारखे नकारात्मक विचार येत रहाणे
- असहाय्यतेची अथवा अपंगत्वाची तीव्र भावना
- लोकांत मिसळावेसे न वाटणे
- एकाकीपणा
- आयुष्यातील रस न उरणे
- लोळागोळा होऊन पडण्याची भीती
- अनामिक काळजी / भय
- विस्मरण
- निद्रानाश
- काहींच्या बाबतीत आत्महत्येचे विचार
भावनिक बदलांची कारणे:
या आधी लिहिल्याप्रमाणे रोज जवळ येणारे परावलंबित्व, औषधांचा खर्च, असहाय्यता आणि यातून पूर्ण बरे कधीच होणार नाही ही भावना यांसारख्या गोष्टी पार्किन्सन्स च्या रुग्णातील भावनिक लक्षणांसाठी कारणीभूत ठरतात. मेंदूतील विविध भागातील कार्य दाखवणाऱ्या काही तपासण्यातून असेही सिद्ध झाले आहे कि या रुग्णात मेंदूमधील ‘ओर्बिटो-फ्रॉन्टल’ भागाचे कार्य कमी प्रमाणात होत असते. साधारणत: हा भाग आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या सुखद भावनांशी निगडीत असतो. या भागाचे कार्य सुद्धा डोपामिनच्या नियंत्रणाखाली चालते.
पुष्पौषधी – एक नैसर्गिक आणि सोप्पी उपचारपद्धती
पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात आजीबाईंचा बटवा असे, ज्याचा वापर करून आपली आजी जुलाब, पोटदुखी, डोकेदुखी, पाय मुरगळणे अशा बारीकसारीक आजारांवर घरातल्या घरातच उपचार करीत असे. त्यातून नाही बरे वाटले तरच डॉक्टरची पायरी चढली जायची. हे झाले शारीरिक आजारांचे, पण रोजच्या जीवनातील मानसिक ताण-तणावांचे काय? त्यावर एक नैसर्गिक व सोप्पा उपाय आहे – पुष्पौषधी !!
निसर्गात उपलब्ध असलेल्या काही विशिष्ठ फुलांपासून बनविलेल्या या ३८ औषधाच्या योग्य वापराने आपण वरील प्रकारच्या भावनिक / मानसिक समस्यांवर अगदी खात्रीलायक मात करू शकतो. प्रसिद्ध ब्रिटीश वैद्यक-चिकित्सक डॉ एडवर्ड बॅच यांनी १९३८ साली जगासमोर सादर केलेल्या या वैद्यकपद्धतीद्वारे रोजच्या जीवनात आपणास भेडसावणाऱ्या नकारात्मक मानसिक भावनांचा इलाज केला जातो. यातील प्रत्येक औषध हे एका विशिष्ठ नकारात्मक भावनेसाठी वापरता येते. नैसर्गिक अवस्थेतील फुलांना पाण्यात उकळून अथवा त्या पाण्याचे भांडे काही काळ उन्हात ठेवून ही औषधे तयार केली जातात. या प्रकारे त्या फुलातील औषधी गुणधर्म पाण्यात उतरून त्यामुळे विशिष्ठ प्रकारच्या सकारात्मक संवेदना जागृत होतात. प्रत्येक औषधाचा योग्य वापर माहित असेल तर अगदी कोणालाही या औषधांचा वापर करता येतो. आपल्याला अथवा आपल्या घरातील व्यक्तीला त्रास देणाऱ्या विशिष्ठ नकारात्मक भावना ओळखून त्यानुसार निवड केलेल्या पुष्पज औषधांचे काही थेंब पाण्यात मिसळून त्यातील थोडे थोडे पाणी घेतल्याने या नकारात्मक भावना कमी होण्यास मदत होते.
पार्किन्सन्सच्या रुग्णांसाठी उपयुक्त काही पुष्पज औषधे:
गोर्स (Gorse):
हे औषध नैराश्यावर उपयोगी ठरते. ‘आता सर्व संपले... कशाचाच काही उपयोग नाही’ अशा स्वरूपाच्या मानसिकतेसाठी किंवा नैराश्यातून कोणत्याही उपचारांना नकार देणाऱ्या रुग्णांची मानसिकता बदलण्यासाठी या औषधाचा उपयोग होतो. अशांना अक्षरश: ओढून डॉक्टरकडे न्यायला लागते, कारण आता कशानेच आपण बरे होत नाही तर औषधाचा काय उपयोग अशी त्यांच्या मनाची घट्ट समजूत झालेली असते.
जेन्शीयन (Gentian):
कोणत्याही गोष्टीचा नकारात्मकच विचार करणाऱ्या लोकांसाठी हे औषध गुणकारी. आजाराबद्दल, औषधे, डॉक्टर अशा सगळ्याच गोष्टींबद्दल सतत एक निराशावादी विचार यांच्या मनात चालू असतो. जेन्शियन दिल्याने एक प्रकारे सकारात्मक विचारांना चालना मिळून औषधोपचार व त्यासोबत सांगितलेले व्यायाम यांना पेशंट योग्य प्रकारे सामोरा जातो.
मिम्युलस (Mimulus) व लार्च (Larch):
विशिष्ठ गोष्टींच्या भितीसाठी – जसे आपण पडू याची भीती व त्यासोबत आत्मविश्वासाचा अभाव, या साठी मिम्युलस व लार्च या दोन औषधांचा उपयोग होतो. मिम्युलस मुळे भीतीवर नियंत्रण येते व लार्च पेशंटचा आत्मविश्वास वाढवते.
स्वीट चेस्टनट (Sweet Chestnut):
काही पेशंट तीव्र नैराश्याच्या आहारी जाऊन आत्महत्येचे विचार व काही वेळा प्रयत्नसुद्धा करतात. अशांना स्वीट चेस्टनट या औषधाने आराम मिळतो. टोकाचे विचार कमी होऊन आजाराला सामोरे जाण्याची मनस्थिती तयार होते.
व्हाईट चेस्टनट (White Chestnut):
मनात सतत येणाऱ्या विचारांचा गोंधळ, त्यामुळे होणारी चीडचीड, निद्रानाश किंवा एकच विचार सारखा सारखा मनात येत राहणे या सारख्या लक्षणांसाठी व्हाईट चेस्टनट हे अगदी उपयुक्त औषध आहे.
ऑलिव्ह (Olive):
पार्किन्सनमुळे होणारी सततची हालचाल (कंप), कमी झालेली भूक, पचनाच्या तक्रारी आणि विचार यासर्वांचे पर्यवसान शारीरिक व मानसिक थकव्यात होते. काहीही करू नये असे वाटते. अगदी पूर्णपणे गळून गेल्याची स्थिती निर्माण होते. अशा अवस्थेसाठी हे औषध परिणामकारक ठरते. पेशंटच्या जोडीदारालाही याची बरेचदा गरज लागते, कारण त्यांचीही बरीच दमछाक होत असतेच.
एक लक्षात घ्यायला हवे, एकूण ३८ औषधांपैकी जवळजवळ सर्वच औषधे विविध लक्षणांनुसार वापरता येतील. या लेखात काही नेहमी लागणारी अथवा कळावयास सोपी अशी औषधे दिली आहेत.
आपल्या रोजच्या अलोपाथिक औषधांसोबत (सिंडोपा वगैरे) ही औषधे घेता येतात व त्याचा एकमेकांच्या गुणांवर काहीही दुष्परिणाम होत नाही. उलटपक्षी, मानसिक अवस्था सुधारल्यामुळे औषधे व इतर उपचारांना रुग्णाची जास्त सकारात्मक साथ मिळून त्याचा फायदा वाढण्यास निश्चित मदत होते.
कोणत्याही होमिओपॅथिक फार्मसी मध्ये ही औषधे उपलब्ध आहेत. योग्य औषधाचे / औषधांचे प्रत्येकी चार चार थेंब कपभर पाण्यात मिसळून दिवसभरात थोडे थोडे घेत राहिल्यास फायदा होतो. एकावेळी तीन-चार औषधे एकत्र देता येतात.
अधिक माहिती साठी:
डॉ अमित करकरे
स्वरूप क्लिनिक, ५४, अमित-दीप, तुळशीबागवाले कॉलनी, पुणे ४११००९.
दूरध्वनी: 9822252533 (मोबाईल)
इमेल: amitkarkare@gmail.com